सोलापूर – दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेला शेतकरी ठार, तर चालक जखमी झाला.
हा अपघात मंगळवारी सकाळ ११ वाजेच्या सुमारास घडला. प्रकाश भानुदास जाधव (वय ५०, रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते व त्यांचा मित्र राजकुमार रामचंद्र पवार (वय ३५, रा. कासेगाव) यांनी सोलापुरात येऊन दिवाळीच्या बाजार केला. त्यानंतर राजकुमारच्या दुचाकीवर पाठीमागे बसून दोघे गावाकडे निघाले.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने (क्र. जेके०३-ई- २६०३) त्यांना धडक दिली. यात दोघे जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेव्हा प्रकाश जाधव हे उपचारापूर्वी मृत झाले. या अपघाताची नोंद जोडभावी पेठ पोलिसांत झाली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तपास हवालदार रूपनर करीत आहेत.