पुणे – चार महिन्यांत ४५९ प्रकरणात तब्बल ६४ काेटी रुपयांची फसवणूक सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे कोणी सांगत असेल तर सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते.
कारण सायबर चाेरट्यांचा शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून नागरिकांचे काेट्यवधी रुपये हडप करण्याचा गाेरखधंदा सुरू आहे, शहरात नागरिकांची दररोज सुमारे ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे, मागील चार महिन्यांत केवळ पुणे शहरातच ४५९ प्रकरणांत नागरिकांना ६४ काेटी ४५ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
व्हाॅटसअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्रॉमसह विविध साेशल मिडियाच्या माध्यमातून सायबर चाेरटे हे शेअर ट्रेडिंग, ब्लाॅक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची जाहीरात करतात, ट्रेडिंगचे प्रशिक्षण देखील दिले जाईल, असे सांगून एक लिंक संबंधितास पाठवून व्हाॅटसअप ग्रुप जाॅइन करण्यास सांगितले जाते.
संबंधित कंपनी चांगल्याप्रकारे नफा मिळवत असल्याचे सांगून इतरांना कशा प्रकारे नफा मिळत आहे, हेही बनावटरित्या दाखवून देत दुप्पट, तिप्पट, चारपट परताव्याचे अमिष दाखवले जाते. सुरुवातीला काही प्रमाणात परतावा देऊन अधिक रक्कम गुंतवणूक करण्यास सांगण्यात येते. त्यानुसार माेठया प्रमाणात गुंतवणूक केल्यावर मात्र, ही रक्कम सायबर गुन्हेगार परत न करता वेगवेगळी कारणे सांगून गुंतवणुकदारास ताटकळत ठेवतात.
याउलट गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्यासाठी आणखी रक्कम भरण्यास भाग पाडून माेठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली जात आहे, गुंतवणुकदार पाेलिसांकडे धाव घेत आहेत असून यात डाॅक्टर, चार्टड अकाऊंटंट, आय.टी. इंजिनिअर, नाेकरदार, व्यवसायिक, रिटायर्ड व्यक्ती आणि गृहिणींची संख्या फसवणूक होणाऱ्यांमध्ये लक्षणीय आहे.