सोलापूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने रविवारी मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावातील दोन ढाब्यांवर टाकलेल्या छाप्यात 2 हॉटेल चालकांसह चार मद्यपी ग्राहकांना अटक करुन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभाग किरण बिरादार यांच्या पथकाने रविवारी (ता. 28 मे) मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाच्या हद्दीत सोलापूर-पुणे हायवेवरील होटेल गुरुदत्त या ढाब्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणी हॉटेल चालक श्याम दत्तात्रय कारे, वय 43 वर्षे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले.तसेच त्या ठिकाणी दोन मद्यपी ग्राहक नामे अक्रूर विठ्ठल खरात वय 37 वर्षे व ज्योतिबा गुलाब चंदनशिवे वय 40 वर्ष हे इसम मद्य पितांना आढळून आल्याने त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 68 व 84 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका दुस-या कारवाईत लांबोटी येथील हॉटेल गौरी या ढाब्यावर छापा टाकून होटेल चालक प्रदीप पंडित नरोटे वय 28 वर्षे व मद्यपी ग्राहक राजेंद्र केरबा वाघमारे व 51 वर्षे व जनार्धन नारायण शिरगिरे वय 52 वर्षे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचे तपास अधिका-यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सोमवारी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ श्री आर.आर. जाधव यांनी हॉटेल चालकाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड व ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड असा एकूण चौपन हजारांचा दंड ठोठावला. ही कारवाई निरीक्षक किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक मयुरा खेत्री, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान गणेश रोडे व प्रकाश सावंत यांच्या पथकाने पार पाडली.
ढाब्यांवर दारु विक्री करणे व दारु पिणे कायद्यान्वये गुन्हा असून याविरोधात कारवाईसाठी विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यास या विभागाकडून त्यांना वार्षिक व आजीवन मद्य सेवन परवाना एक दिवसात मंजूर केला जातो, तेव्हा कोणीही धाब्यावर बसून दारू पिऊ नये अन्यथा त्यांचेविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नितीन धार्मिक यांनी दिला आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...