सोलापूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारुविरोधात जिल्हाभरात मोहिम तीव्र केली असून 13 जून मंगळवारी मुळेगाव तांडा आणि शहर परिसरात राबविलेल्या विशेष मोहिमेत हातभट्टी दारु निर्मिती, विक्री आणि वाहतुकीचे 10 गुन्हे नोंदविले असून, 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण राज्यभरात “हातभट्टीमुक्त गाव” ही संकल्पना राबविण्याचा संकल्प केला असून त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर अचानकपणे छापे टाकून कारवाई केली जात आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील सहा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान हातभट्टी दारु गाळण्याकरिता वापरण्यात येणारे सोळा हजार पाचशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायन जागीच नाश करण्यात आले असून विजय चंदू राठोड, वय 41 वर्षे व मीनाक्षी शाखा पवार, वय 37 वर्षे यांना अटक करण्यात आली.
दुय्यम निरिक्षक रामलिंग भांगे यांच्या पथकाने नागनाथ शंकर पवार, वय 43 वर्षे, रा. मुळेगाव हा इसम त्याच्या हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकीवरुन दोन रबरी ट्यूबमध्ये 160 लिटर हातभट्टीची वाहतूक करतांना आढळून आल्याने त्याच्या ताब्यातून वाहनासह एकूण 68 हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापूर शहरात हातभट्टी दारु विकणा-यांविरुद्धही कारवाई करण्यात आली असून अलकुंटे चौक लष्कर येथील अजय राम पात्रे, वय 27 वर्षे याच्या ताब्यातून 30 लिटर, रविवार पेठ येथील कौशल्याबाई मारुती गुजराती, वय 59 वर्षे हीच्या ताब्यातून 70 लिटर व रविवार पेठ येथील परमेश्वर दत्तात्रय गायकवाड, वय 39 वर्षे याच्या ताब्यातून 40 लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली असून त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण मोहिमेत विभागाकडून 300 लिटर हातभट्टी दारु, 16550 लिटर रसायन आणि एक मोटरसायकल असा एकूण 4 लाख 50 हजार 210 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक राहूल बांगर, सुनिल कदम, दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, उषाकिरण मिसाळ, मानसी वाघ, कृष्णा सुळे, अक्षय भरते, शिवकुमार कांबळे, रामलिंग भांगे, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड, ईस्माईल गोडीकट, अशोक माळी, अण्णा कर्चे, किरण खंदारे यांनी पार पाडली.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...